विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडण्याची तयारी सुरू आहे. स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणारे आणि सांस्कृतिक वारसा जपणारे व्यासपीठ मानले जाते. या निमित्ताने नवी-जुनी गाणी, नृत्य, नाट्य, विविध कला सादरीकरणे व स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक विद्यार्थी यासाठी मेहनत घेऊन सराव करत असतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या गाण्यांवरून एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. शाळेतील कार्यक्रमात सादर होणारी महापुरुषांची गाणी निवडण्याचा अधिकार शिक्षकांकडे असावा, जेणेकरून कोणत्याही महापुरुषांचा अवमान होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनीही सांगितले की, गाण्यांची निवड ही शिक्षकांशी चर्चा व विचारविनिमय करूनच होती.
असे असतानाही दरवर्षी याच मुद्द्यावरून वाद निर्माण होतो आणि महापुरुषांच्या गाण्यांबाबत आक्षेप घेतला जातो, असा आरोप काही पालक व ज्येष्ठ मंडळींनी केला आहे.
या संदर्भात चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, संस्थेच्या अध्यक्षांकडून उलटसुलट व दमदाटीच्या भाषेत उत्तर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. “तुम्ही या संस्थेत काम करत नाही, त्यामुळे बोलण्याचा अधिकार नाही,” असे वक्तव्य करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर बोलताना काही शिक्षकांनी सांगितले की, महापुरुष हे केवळ एका धर्माचे किंवा एका विचारसरणीचे नसून, ते सर्वसमावेशक विचारांचे प्रतीक आहेत. सर्व धर्मसमभाव, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी महापुरुषांचे योगदान आहे. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असतानाही, समजावणाऱ्यालाच दमदाटीची भाषा वापरणे दुर्दैवी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, स्नेहसंमेलनासारख्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमात वाद नको, तर संवादातून मार्ग काढावा, विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर व्हावा आणि महापुरुषांचा सन्मान अबाधित राहावा, असे ते म्हणाले.
एकीकडे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी देणारे स्नेहसंमेलन, तर दुसरीकडे त्याच कार्यक्रमात वादाची छाया या सगळ्या घडामोडींकडे समाज, पालक आणि विद्यार्थी लक्ष ठेवून आहेत. पुढील काळात संवादातून तोडगा निघतो का, की हा वाद आणखी वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
