नागपूर : सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीला ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे उपस्थित होते.
या बैठकीत सांगोला मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा प्रकल्प, रस्ते विकास, सिंचन कामे, ग्रामीण सुविधांची उभारणी असे अनेक मुद्दे समोर ठेवत आमदार देशमुख यांनी सांगोल्याच्या विकासासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगोल्याबद्दल विशेष आत्मीयता व्यक्त करत स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या कामाची आठवणही करून दिली. “सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. या भेटीमुळे सांगोल्यातील विकासकामांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
