सांगोला : सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय तापमान वाढले आहे. प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकात आता चर्चा फक्त एकाच मुद्द्यावर “कोणाला मिळणार नगराध्यक्षपदाची सोन्याची लॉटरी?”
शहरात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, विविध पक्षांमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या सर्वच पक्षांनी यंदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने लढत चुरशीची आणि रोमहर्षक ठरणार आहे.
राजकारणात नव्या ‘समीरकरणा’ची चाहूल!
सांगोला शहरातील राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहेत. “राजकारणात कोणी कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही” हे वाक्य येथे अक्षरशः खरे ठरते आहे. काही ठिकाणी जुने शत्रू हातमिळवणी करत असल्याची चर्चा रंगली असून, यामुळे नव्या ‘समीरकरणा’चा फटका अनेकांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय गलियार्यात जोर धरत आहे.
नगराध्यक्षपदावर सर्वांचे लक्ष : कोण ठरणार अंतिम चेहरा?
नगराध्यक्षपदासाठी सर्वच दिग्गजांनी आपापले मोहरे पुढे केले आहेत.
शेकापकडून मारुती बनकर (आ. डॉ. बाबासाहेब देशमुख गट)
शिवसेनेकडून आनंदा माने (माजी आ. शहाजीबापू पाटील गट)
शिवाजी बनकर (माजी आ. दीपकआबा साळुंखे पाटील गट)
काँग्रेसकडून विश्वेश झपके
दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी सांगोल्यात मोठे संकेत मिळतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुती की स्वतंत्र झुंज?
महायुती आणि महाविकास आघाडीत समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येतो आहे. मित्रपक्षांना न विचारता सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार घोषित केल्याने “धक्कातंत्रा”चा वापर झाल्याची चर्चा आहे. उमेदवारांच्या संख्येचा उच्चांक मोडला असून, अनेकांनी तर या पदासाठीच नव्या पक्षात प्रवेश केला आहे. अखेरीस “जिंकून देणारा चेहरा” कोण ठरणार, हेच सांगोला शहराच्या भवितव्याचे चित्र ठरवणार आहे.
काँग्रेससमोर अस्तित्वाची झुंज!
एकेकाळी सांगोला नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता असलेली काँग्रेस आज अस्तित्वासाठी झगडताना दिसते. पक्षातील काही इच्छुक उमेदवारीसाठी विरोधकांच्या दारात पोहोचल्याची कुजबुज आहे. अशा स्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले यांच्या खांद्यावर आहे.
सांगोल्यातील निवडणूक रंगणार केवळ चुरशीचीच नाही तर “आश्चर्यकारक”ही ठरणार आहे.
प्रत्येक पक्षात असंतोष, प्रत्येक गटात आपापले हिशेब : आणि प्रत्येक गल्लीतील चर्चेचा एकच मुद्दा…पाहा In Public News वर
