तुळजापूर तीर्थक्षेत्रात पार्किंगची लूटमार! सामान्य भक्तांना ५०० रुपयांचा दंड तर VVIP साठी एका कॉलवर ‘फ्री’ सुटका?
इन पब्लिक न्यूज : तुळजापूर शक्तिपीठात ‘आई तुळजाभवानी’च्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र, मंदिराच्या दाराशीच पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वसुलीच्या प्रकाराने भक्त वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
सामान्य भक्तांकडून ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड आकारला जात असताना, राजकीय नेते, आमदार-खासदार आणि तथाकथित VVIP लोकांच्या गाड्या फक्त एका फोन कॉलवर ‘फ्री’ सोडल्या जात असल्याचे उघड झाले आहे. या भेदभावपूर्ण आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आता भक्तांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे.
कर्नाटकातील भक्ताचा अनुभव ठरला चर्चेचा विषय!
कर्नाटकातून दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने आपल्या गाडीवर झालेल्या वसुलीविरोधात आवाज उठवला. त्याची गाडी मंदिराजवळ पार्क केल्यामुळे स्थानिक पार्किंगवाल्यांनी ५०० रुपयांचा दंड आकारला. पोलिसांकडे तक्रार केली, पण ती दुर्लक्षित करण्यात आली. मात्र, काही वेळातच त्या भक्ताच्या ओळखीचा एका आमदाराच्या पीएचा फोन आला आणि गाडी लगेच सोडण्यात आली!
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. “आईच्या दारातच असा भेदभाव का? सामान्यांसाठी दंड आणि नेत्यांसाठी सवलत?” असा प्रश्न भक्तांनी उपस्थित केला. “#TuljapurParkingLoot” हा हॅशटॅग ट्विटर आणि फेसबुकवर ट्रेंड झाला आहे.
पार्किंगची ‘ब्लॅक मार्केटिंग’ यंत्रणा उघडीपणे सुरू
मंदिर परिसरात दररोज शेकडो गाड्या येतात. पण अधिकृत पार्किंगची क्षमता फक्त २०० ते ३०० गाड्यांपुरतीच आहे. उर्वरित भाविकांची गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात, आणि तिथेच सुरू होते “लूटमार”
एका स्थानिक व्यापाऱ्याने सांगितले :
दिवसाला ५० ते १०० गाड्यांवरून सुमारे २५ हजार रुपये वसूल होतात. यात काही स्थानिक पोलिस आणि मंदिर ट्रस्टचेही लोक सहभागी आहेत. कमिशन ३०% असते, म्हणून कारवाई कोणी करत नाही. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात तर वसुलीचा हा आकडा विक्रमी पातळीवर गेला असल्याचे बोलले जात आहे.
सामान्य भक्त विरुद्ध VVIP : दोन वेगळे नियम!
सामान्य भक्तांसाठी : ५०० रुपयांचा दंड, गाडी जप्त आणि तासन्तास त्रास
VVIP साठी : एका आमदाराच्या किंवा अधिकाऱ्याच्या फोनवर तात्काळ गाडी सुटका
बळी ठरणारे : कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील भाविक : बाहेरच्या वाहनांना जास्त लक्ष्य
प्रशासनाची भूमिका: कारवाईचा फक्त दिखावा!
धाराशिव जिल्हाधिकारी आणि तुळजापूर पोलिस अधीक्षक यांनी तपास सुरू आहे असे सांगितले असले तरी, गेल्या तीन महिन्यांत एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही.
मंदिर ट्रस्टनेही अधिकृत पार्किंग वाढवू अशी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नाही.
भक्तांचा केला थेट सवाल : ‘आईच्या दारातही न्याय विकत घ्यावा लागतो का?’
या संपूर्ण प्रकारामुळे तुळजापूर शक्तिपीठाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाविक आता प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून तपासणी, दोषींवर कारवाई आणि अधिकृत पार्किंगची व्यवस्था सुधारावी अशी मागणी करत आहेत.
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलो, पण इथे भक्ती नव्हे तर पैशाचीच पूजा चालते, असे म्हणत एक स्थानिक भाविक संतापाने म्हणाला.
