अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा अवमान? कुलगुरू,प्रकुलगुरू यांना खडेबोल सुनावत उसळला संतापाचा ज्वालामुखी!
विशेष प्रतिनिधी : पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचा 21 वा “उन्मेष – सृजन रंग” युवा महोत्सव 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुरू झाला आहे. परंतु, महोत्सवाच्या पहिल्याच दिवशीच उद्घाटन समारंभात अभूतपूर्व राडा झाला, आणि एकच खळबळ उडाली आहे.
युवा महोत्सवासाठी विद्यापीठाकडून निधी दिला जातो तो अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मंजूर करतात. तरीदेखील, महोत्सवाच्या उद्घाटनात त्या सदस्यांना मानपान दिला जात नसेल तर ते दुर्दैवी आहे. उद्घाटनाला कुलगुरुंसह ठराविक अधिकारी आणि संस्थेचे काही पदाधिकारीच स्टेजवर होते.
५-७ अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य उपस्थित होते, त्यांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करावा, एवढीच माफक अपेक्षा होती. मात्र, तसे न करता मोजक्या अधिकाऱ्यांनीच महोत्सवाचे उद्घाटन उरकले. त्यावर नाराजी व्यक्त करत राजाभाऊ सरवदे, डॉ. विरभद्र दंडे, चन्नवीर बंकुर, मल्लिनाथ शहाबादे आदी सदस्य तेथून निघून गेले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रकलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या दुटप्पी, स्वार्थी आणि खुनशी वागण्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे आरोप होत आहेत. विद्यापीठातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुलगुरूंवर आधीपासूनच विविध गैरप्रकारांचे आरोप असून, अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्याविरोधात आवाज उठवला होता. याच पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यात अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना मुख्य मंचावर स्थान न देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे कार्यक्रमादरम्यान मोठी चीड आणि संतापाची लाट उसळली.
राजाभाऊ सरवदे, डॉ. विरभद्र दंडे, चन्नवीर बंकुर, मल्लिनाथ शहाबादे आदी सदस्य कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाला खडेबोल सुनावत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
राजाभाऊ सरवदे म्हणाले, “गेल्या २० वर्षांत कधीच असे झाले नव्हते. या कुलगुरूंनी जाणीवपूर्वक आमचा अवमान केला आहे. याला आम्ही निश्चितच उत्तर देऊ!” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “महाविद्यालयाची कोणतीही चूक नसून विद्यापीठातील कुलगुरू आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी महाविद्यालयाला चुकीचे मार्गदर्शन केले,” अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेमुळे युवा महोत्सवाच्या उत्सवी वातावरणावर विद्यापीठातील या अधिकाऱ्यांनी काळिमा फसली तसेच विद्यापीठातील अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे आहे. विद्यार्थी व शिक्षक वर्गामध्ये या प्रकारामुळे नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारच्या बैठकीत गोंधळाची शक्यता
गुरुवारी (ता. ९) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. ४ ऑक्टोबरच्या बैठकीतही विविध विषयांवरून कुलगुरू व काही सिनेट सदस्यांमध्ये जुंपली होती. आता युवा महोत्सवातील उद्घाटनावेळीच्या मानपानाचे पडसाद गुरूवारच्या बैठकीत उमटतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
