सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे गावे पाण्याखाली गेली असून, लाखो हेक्टर शेतीचा बोजवारा उडाला आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून हजारो क्विंटल माती वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य व मदत सुरु आहे. तसेच पूरग्रस्त भागासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे.


दरम्यान, सोलापूर विद्यापीठाचा २१ वा उन्मेष सृजनरंग युवा महोत्सव हा 7 ते 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे. मात्र जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक विद्यार्थी संघटना व सामाजिक संस्थांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. कारण, सध्या अनेक महाविद्यालये पाण्याखाली असून विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत महोत्सवात सहभागी होता येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
पूरग्रस्तांच्या अश्रूंमध्ये संस्कृतीचा उत्सव?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा महोत्सवासाठी विद्यापीठाच्या 36 समित्यांचे कामकाज सुरू असले तरी यावर एक बैठक पार पडणार असून या बैठकीत युवा महोत्सव पुढे ढकलायचा की ठरल्याप्रमाणे आयोजित करायचा यावर अंतिम निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी मात्र स्पष्ट सांगितले आहे की, आम्हाला सध्याच्या परिस्थितीत महोत्सवात सहभागी होता येणार नाही.
सर्वांचे लक्ष सोलापूर विद्यापीठाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहे याकडे लागले आहे.

