नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट घेत महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदन सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही होते.
राज्य सरकारने केले 60,000 कोटींचे करार
भारताला लागणार्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.
यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे केली.
मोदी 8 व 9 ऑक्टोबरला मुंबईत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. नवी मुंबईला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशीही माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
