सोलापूर : अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला. या पुराच्या पाण्यामुळे सोलापूर–विजयपूर महामार्गावरील हत्तूर गावाजवळील रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. बुधवारी दिवसभर रस्त्यावर पाच फूटापेक्षा अधिक पाणी असल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प राहिली. गुरुवारीदेखील सकाळीपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने रस्ता बंदच ठेवावा लागला. मात्र गुरुवार संध्याकाळपासून पाणी हळूहळू ओसरू लागल्याने आज वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर–विजयपूर महामार्ग हा दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. हत्तूर गावाजवळील रस्ता सीना नदीच्या पुरामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला. हा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने वाहनचालकांची गैरसोय होऊ नये व कोणत्याही प्रकारचे अपघात घडू नयेत यासाठी पोलिस व प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत महामार्ग बंद केला.
महामार्ग बंद झाल्याने सोलापूर व विजयपूर या दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. खाजगी वाहतूक, एस.टी. बसेस, तसेच मालवाहतूक गाड्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. परिणामी प्रवासाचा कालावधी दुप्पट झाला.
नागरिकांची गैरसोय
गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली. अनेकांना वेळेत ठिकाणी पोहोचता आले नाही. मालवाहतूक बंद असल्याने भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे महामार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
तिर्हे पुलावरून वाहतूक सुरू
सकाळपासून तिर्हे पूलावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तरीही हत्तूरजवळील महामार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरलेले नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तो मार्ग अद्याप बंद ठेवला आहे.
प्रशासनाचे प्रयत्न
महापूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांनी सतत देखरेख ठेवली आहे. पाणी ओसरल्यानंतर महामार्गाची पाहणी करून रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करूनच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
गुरुवार सायंकाळी पाणी ओसरण्याची गती पाहता आज (शुक्रवारी) रस्त्यावरची परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. पाणी पूर्णपणे ओसरल्यास व रस्त्यावर चिखल वा इतर अडथळे नसल्यास प्रशासन वाहतूक सुरू करेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांचे आवाहन
दरम्यान, पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोलापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हत्तूर गावाजवळील पूरस्थिती सामान्य झाल्यानंतर सोलापूर–विजयपूर महामार्ग पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता असून प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
