सोलापूर/प्रतिनिधी : शहरात दोन महिलांनी जोगवा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून २२ वर्षीय महिलेला फसवून ६५ हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित महिलेस ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार दोन महिला जोगवा मागण्याच्या कारणाने त्यांच्या घरी आल्या. बोलण्यातून विश्वास संपादन करत त्यांनी “तुझ्या नवऱ्यावर संकट आहे, अपघात होणार आहे, त्यासाठी पूजा करावी लागेल. घरातील पैसे माझ्या परडीत टाक, देवी तुझं भलं करेल,” असे सांगत महिलेला भुरळ घातली.
फिर्यादी महिलेने वडिलांनी गाडी खरेदीसाठी ठेवलेले ६५ हजार रुपये संशयित महिलांच्या सांगण्यानुसार परडीत ठेवले. पैसे घेतल्यानंतर दोन्ही महिला घरातून निघून गेल्या. ही बाब दुपारपर्यंत गुप्त राहिली. मात्र सायंकाळी फिर्यादीच्या पतीला घटनेची माहिती समजताच महिलेला फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या महिलेकडून चौकशी सुरू असून, अशा प्रकारच्या घटना इतरत्र घडल्या आहेत का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगितले.
