विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली आहेत. घरात, शेतात आणि जनावरांच्या गोठ्यांत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज असताना नेते-लोकप्रतिनिधींचे फक्त पाहणी दौरे सुरू आहेत.
लोकप्रतिनिधी मदतीसाठी येतात का फोटो काढण्यासाठी?
पूरग्रस्तांचा संताप ओसंडून वाहत आहे. “हे लोकप्रतिनिधी मदतीसाठी येतात का फोटो काढण्यासाठी? आश्वासनांची मालिका सुरू आहे, पण भरीव मदत कुणी करत नाही. आमच्या हालअपेष्टा कोणी सोसत नाही, आम्हाला फोटोसेशन नको तर मदत हवी,” असा थेट सवाल पूरग्रस्तांनी उपस्थित केला आहे.
३ दिवसाच्या कार्यक्रमावर लाखोंचा खर्च
नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी नेते लाखोंचा खर्च कार्यक्रमांवर करतात, अशी जोरदार टीका होत आहे. “आमचे संसार उघड्यावर आहेत, पण नेत्यांचे ताफे, रोड शो मात्र सुरू आहेत. पावसामुळे रस्ते घसरडे झाले तरी त्याकडे लक्ष नाही. परंतु कार्यक्रमांसाठी लाखोंचा खर्च करून रस्ते तयार केले जात आहेत. गाडीतून येतून गाडीत जाण्यासाठी रस्ते केले जात आहेत परंतु नागरिकांसाठी नाही. तर पूरग्रस्तांना मदतीसाठी एक पै सुद्धा खर्च होत नाही,” असा आरोप नागरिकांनी केला आहे.
आमचे संसार उघड्यावर, नेत्यांकडून मात्र आश्वासने आणि बैठका! : संतप्त पूरग्रस्त
पूरस्थितीमुळे अन्न, निवारा, औषधे व जनावरांच्या देखभालीसाठी मदतीची नितांत गरज आहे. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका फक्त बैठका व पाहणीपुरतीच मर्यादित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
