सांगोला / प्रतिनिधी : कटफळ ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या जनाबाई रंगा चव्हाण यांची निवड झालेली आहे. या निवडणुकीत सरपंच अश्विनी सोमनाथ सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी नवीन निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीसाठी दीपक अशोक धांडोरे, मंडाबाई जगन्नाथ शेळके व जनाबाई रंगा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र धांडोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणूक मंडाबाई शेळके व जनाबाई चव्हाण यांच्यामध्ये झाली.
मतदानामध्ये जनाबाई चव्हाण यांना सहा सदस्यांचा पाठिंबा मिळाला, तर मंडाबाई शेळके यांना पाच सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने सरपंचपदी जनाबाई रंगा चव्हाण यांची अधिकृत निवड झाली. निवडणूक प्रमुख मंडळ अधिकारी जाधव यांनी याबाबत जाहीर घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी. ए. बुरुंगले उपस्थित होते
निवडीनंतर सांगोला येथील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात नव्या सरपंचांचा सत्कार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मा. आबांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील :
“कटफळ ग्रामपंचायतीने जनाबाई चव्हाण यांची सरपंच पदी निवड करून योग्य निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासासाठी गट-राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मी स्वतः कायम गावच्या विकासकामासाठी सोबत राहीन. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि शेती विकास यासाठी प्राधान्याने कार्य करावे.
नूतन सरपंच जनाबाई रंगा चव्हाण :
गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सरपंच पदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरेल यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करीन. आमचे नेते मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चौफेर विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. गावातील महिलांचा सक्षमीकरण, तसेच गावात स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष देईन. सर्वांसोबत मिळून गावाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे.”
