मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत दुसऱ्या दिवशीही उग्र वळण मिळाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी, शौचालयातील सुविधा आणि निवाऱ्याची व्यवस्था न झाल्यामुळे आंदोलकांचा संताप वाढला.
* प्रशासनाकडून सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स व खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली.
* मोठ्या संख्येने आलेले मराठा समाज बांधव काल रात्रभर उपाशी राहिले.
* निवाऱ्याअभावी आंदोलकांना सीएसएमटी स्थानकातच मुक्काम करावा लागला.
शनिवारी सकाळी परिस्थिती चिघळली. उपाशीपोटी संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून बनवायला सुरुवात केली. या दरम्यान रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आणि मोठ्या प्रमाणात बस व टॅक्सी अडकून पडल्या.
पोलिसांची कारवाई व सुरक्षा :
वाहतुकीची कोंडी वाढल्याने मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) देखील मैदानात उतरवण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलकांनी स्पष्ट केले की, आम्ही शांततेत आंदोलन करतो आहोत, पण खाण्यापिण्याची व राहण्याची मूलभूत सोय न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल.
मुंबईत आंदोलन सुरू असताना प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील हा तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
