मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल आहेत. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना, राज्य सरकारनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा मोठा निर्णय :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत केलेल्या वंशावळ समित्यांना 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या समित्या तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून, मराठा समाजातील पात्रांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्या पुढील दोन वर्षे कार्यरत राहतील. याबाबतची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
प्रमुख घडामोडी :
* मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू – आज दुसरा दिवस
* राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी
* सरकारकडून वंशावळ समित्यांना 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ
* तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र वितरणाचे काम सुरू राहणार
