
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात यावर्षी एकूण १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली असून, या सर्व मंडळांकडून उत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मंडळांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
यावर्षीचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, सर्व मंडळांना पारंपरिक वाद्यांसह उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत डीजे, डॉल्बी यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, ध्वनीप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत होते. त्यामुळे यंदा प्रशासनाने स्पष्टपणे डॉल्बीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस निरीक्षक घुगे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा उत्सव आहे. मंडळांनी आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य द्यावे. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.”
सार्वजनिक ठिकाणी मूर्ती स्थापना करताना जागेची सुरक्षितता, वाहतुकीची कोंडी टाळणे, आरती-भजनाच्या वेळी ध्वनी मर्यादांचे पालन करणे आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त राखणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
डॉल्बी बंदी संदर्भात सांगोला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही प्रशासनाच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा पथकांच्या साथीनेच विसर्जन मिरवणूक काढण्याची तयारी सुरू केली आहे. तर काही मंडळांनी बालगणेश, हरित गणेश आणि प्लास्टिकविरहित उत्सवाचा संकल्प केला आहे.
यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक लक्ष ठेवले जाणार आहे. मंडळांना परवानगी घेताना दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल, असेही पो.नि.विनोद घुगे यांनी बोलताना सांगितले.
तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून होणाऱ्या सामाजिक उपक्रमांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार असून, सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा पोलिस विभागाकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन अधिकाधिक मंडळे समाजोपयोगी कामाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सांगोला तालुका हा परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेसाठी प्रसिद्ध असून, गणेशोत्सवाच्या काळात गावोगाव ऐक्याची भावना वृद्धिंगत होते. परंतु डीजे, डॉल्बीमुळे निर्माण होणारी दहशत आणि अस्वस्थता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. यंदा प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव होण्याची चिन्हे आहेत.
गणेशोत्सव हा आनंद, शिस्त आणि भक्तीभावाने साजरा करण्याचा आहे. त्यामुळे “आपल्या परंपरेनुसार पारंपरिक वाद्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनच बाप्पाचे स्वागत व विसर्जन करूया,” असे आवाहन पोलिस प्रशासन व सामाजिक संघटनांनी नागरिकांना केले आहे.