
मुंबई/प्रतिनिधी : परिवहन विभागातील ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्यानिमित्ताने भव्य पदचिन्ह (Rank Insignia) सन्मान सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, सह-परिवहन आयुक्त (प्रशासन) संजय मेत्रेवार, जयंत पाटील, अनिल पाटील यांच्यासह विभागातील अनेक प्रादेशिक अधिकारी, नव्याने पदोन्नती मिळालेले निरीक्षक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. अप्पर आयुक्त भरत कळसकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, परिवहन विभागाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, या पावलामुळे विभागातील कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक होणार आहे.
यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक पदचिन्ह प्रदान करण्यात आले. उपायुक्त अनिल पाटील यांनी नव्या निरीक्षकांना शपथ दिली.
आपल्या भाषणात आयुक्त विवेक भिमनवार यांनी पदोन्नत निरीक्षक ITMS (Integrated Traffic Management System) च्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना, “जनतेची कामे शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करा, तसेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी काटेकोरपणे वाहन तपासणी करा, असे आवाहन केले. यासोबतच रिक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.