
विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुका शांतताप्रिय म्हणून अनेक वर्षांपासून ओळखला जात होता. परंतु अलीकडच्या काळात मारामारी, चोरी व अशांततेच्या घटनांत अचानक वाढ झाली आहे. यामुळे तालुक्याची शांतता भंगली असून गावकऱ्यांत प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सवाल जनतेचा : नेमकं वरदहस्त कोणाचा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावे गावातील एका हॉटेलजवळ तब्बल १५ ते २० जणांनी ४ जणांवर काठी, रॉड, लोखंडी चैन यांसारख्या हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्लेखोर दहा-बारा गाड्यांतून आले होते व दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जेवणाचे पैसे व अवैध दारू विक्री तसेच दारूचे बिल या कारणावरून वाद निर्माण होऊन हा तुफान राडा झाला असल्याची चर्चा आहे.
या घटनेवर पोलिस तपास सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नेमकं कोणाचा वरदहस्त ?
शांतताप्रिय तालुक्यामध्ये अशा प्रकारे अशांतता पसरवणे, गावगुंडांकडून दहशत निर्माण करणे, यामागे नेमके सूत्रधार कोण आहेत? गावगुंडांना कोणाचा वरदहस्त आहे ? असा सवाल जनतेने केला आहे.