
सांगोला : शेतकरी, पशुपालक व व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात सांगोला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.
खोत म्हणाले की, गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षकांकडून शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांची लुट होत आहे. आमच्या जनावरांच्या गोठ्यावर दिवसाढवळ्या दरोडे टाकणाऱ्या गोरक्षकांना आता तोंड द्यायलाच हवे.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी शेतीसोबतच पशुपालन व दूध व्यवसायावर कुटुंबाचा संसार चालवतात. शासनाने गोमातेला ‘राजमाता’चा दर्जा दिला, पण गोवंश हत्या बंदी कायदा राबवायचा असेल तर शेतकऱ्याला प्रति जनावर अनुदान द्यावे; अन्यथा हा कायदा रद्द करावा.
राज्यातील २९५ गोशाळांमध्ये २ लाख गायी असून, शेतकऱ्यांकडे सुमारे दीड कोटी जनावरे आहेत.संकरित बैल, खोंड विक्रीवर गोरक्षकांकडून होणाऱ्या दडपशाहीविरोधात आता शेतकरी चळवळ उभी राहील असे खोत यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, यावेळी बोलताना म्हणाले, गोवंश हत्या बंदी कायदा व गोरक्षका विरोधात तहसील कार्यालयावर हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या कायद्याची चुकीच्या दिशेने अंमलबजावणी सुरु आहे. खिलार जनावरे वाचवली पाहिजेत आणि त्यांच्यात वाढ झाली पाहिजे ही शासनाची भूमिका घ्यावी. सरकारने गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये योग्य ते बदल करावेत, असे ते म्हणाले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार म्हणाले, गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षकाची लूट केली जात आहे. शेतकरी वर्गावर मोठा अन्याय होत आहे. खिलार जाणावरे सांभाळण्यासाठी सरकारकडून अनुदान द्यावे. सरकारकडून मायबाप शेतकऱ्यावर अन्याय करत आहे. असे ते म्हणाले.
यावेळी बापूसाहेब ठोकळे म्हणाले, आमच्या कष्टाचे फळ आम्हाला द्या. यापुढे व्यापारी व पशुपालक शेतकरी गोरक्षकांना चागलाच धडा शिकवतील. गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा. व्यापारी ,खाटीक, कुरेशी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मोर्चामध्ये सहभागी आहेत असे ते म्हणाले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब बनसोडे, सुबोध वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम, शिवसेनेचे युवा नेते तुषार इंगळे, ॲड. महादेव कांबळे, सुहास पाटील उपस्थित होते. तसेच या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, पशुपालक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होते.
https://www.facebook.com/share/v/1PHbdyoSsj/