
विशेष प्रतिनिधी : गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) म्हटला की घराघरात आनंद, उत्साह आणि भक्तीची लाट उसळते. सजावट, आरास आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या मनाचा केंद्रबिंदू असते. या मूर्ती केवळ मातीच्या नसतात, तर त्यात कलाकाराची भक्ती, प्रेम आणि कौशल्य यांचा सुंदर संगम असतो.(Ganesh Chaturthi)
असाच संगम गेली १५ ते २० वर्षे सांगोला सचिन कुंभार यांच्या हातून साकारला जात आहे. ते तालुक्यातील गणेशमूर्ती बनवणारे (Ganesh Chaturthi) एकमेव पारंपरिक कुंभार म्हणून ओळखले जातात. वर्षभर त्यांच्या कार्यशाळेत मूर्ती घडवण्याचे काम सुरू असते, मात्र गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वी इथे खास गडबड आणि रंगत येते.
मूर्तींमध्ये परंपरागत कलाशैली आणि आधुनिक डिझाईन्सचा सुंदर मेळ दिसतो. नाजूक चेहरेपट्टी, भावपूर्ण डोळे, रंगसजावटीतील बारकावे आणि विविध मुद्रांमधील बाप्पांचे रूप पाहणाऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सांगोला शहरासह तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील गावांतही त्यांच्या मूर्तींची मोठी मागणी आहे.
साध्या, पारंपरिक मूर्तींपासून ते भव्य, संकल्पनात्मक मूर्तींपर्यंत विविध प्रकार ते घडवतात. पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती बनवण्याला ते विशेष प्राधान्य देतात. सचिन कुंभार सांगतात, “मूर्ती बनवणे हा फक्त व्यवसाय नाही; ही श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा आहे. प्रत्येक मूर्ती ही माझ्यासाठी बाप्पाचं रूप असते, त्यामुळे मनापासून मेहनत घेऊनच ती घडवतो.(Ganesh Chaturthi)
गणेशोत्सव जवळ येत असताना त्यांच्या कार्यशाळेत मातीचा गंध, रंगांचा सुगंध आणि हातांनी घडणाऱ्या बाप्पांच्या मोहक रूपांचा देखावा पाहायला मिळतो. भक्तांच्या घरी पोहोचणारी प्रत्येक मूर्ती ही त्यांच्या कलाकुसरीचे आणि भक्तीभावाचे सुंदर प्रतीक ठरते.(Ganesh Chaturthi)