
सांगोला : सांगोला-पंढरपूर रोडवरील देशमुखवस्ती भीषण अपघातात बामणी येथील संतोष धोंडीराम जाधव (रा. बामणी, ता. सांगोला) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.(Accident )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान ज्योतीराम जाधव यांच्या माहितीनुसार, मृत संतोष जाधव हे रविवारी सांगोला येथे आठवड्याचा बाजार करून दुपारी चारच्या सुमारास एमएच-४५-व्ही-८३५० या दुचाकीवरून बामणी येथे परतत होते. देशमुख वस्ती जवळ आल्यानंतर पंढरपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-४५-एएक्स-०९४० या पिकअपने विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला जोराची धडक दिली.(Accident )
या अपघातात संतोष जाधव यांच्या डोक्यास, छातीस गंभीर दुखापत झाली तसेच उजवा पाय गुडघ्याखालून तुटला. तातडीने त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.(Accident)
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भातुगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक घोंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय भातुगडे करत आहेत. (Accident)