
विशेष वृत्त : जुन-जुलैमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या.(Rain) सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर यांसारख्या खरीप पिकांची शेतात हरित पालवी डोकावू लागली, पण आता आकाशात एकही ढग नाही… आणि शेतकऱ्याच्या कपाळावर चिंता आहे.
शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे नुसती मेहनत नाही, (Rain) तर विश्वास, धैर्य आणि सततची अनिश्चितता. या वर्षी सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या. परंतु, जशी पेरणी झाली, तशी पावसानेही पाठ फिरवली. (Rain)
मागील काही आठवड्यांपासून पावसाने उघडीप घेतली असून, आकाश कोरडे आणि शेत कोमेजले आहे. खरीप पिकांना आता पाण्याची अत्यंत गरज आहे, विशेषतः सोयाबीनसारख्या पिकांचे भवितव्य लोंबकळते आहे. काही भागात पेरणीनंतर एकदाही पाऊस न पडल्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नाही. परिणामी, दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे.
गवत वाढले, मशागत अडली, रोटरनेच झाली सुरुवात
यावर्षी मे-जूनमध्ये अधूनमधून पावसामुळे (Rain) शेतकरी उन्हाळी मशागत नीट करू शकले नाहीत. त्यामुळे जमिनीत गवत वाढले आणि रोटरनेच पेरणी करावी लागली. अशा रोटर केलेल्या जमिनीत हवेचा खेळ वाढतो आणि जर वेळेवर पाऊस न पडला, तर जमिनीची ओलही जाते. याचा थेट परिणाम उगवण व पीक विकासावर होतो आहे.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस…?
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला होता. पण प्रत्यक्षात बार्शी आणि वैराग भागात पावसाने फक्त ‘हजेरी’ लावली. सुरुवातीला आलेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले. आता मात्र ढग दूर गेले आहेत आणि जमिनीवर चीक, हताश नजर आणि ओल्या डोळ्यांतून पावसाची वाट पाहणारा बळीराजा आहे.
रब्बी जिल्ह्यात खरीप संकटात
सोलापूर जिल्ह्याला पारंपरिक ‘रब्बी जिल्हा’ म्हणून ओळख मिळालेली असली तरी, बदलत्या काळात खरीपावरही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पण मागील तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता याही वर्षी खरीप हंगाम संकटात दिसतो आहे.