
Dr. Mohan Bhagwat
सोलापूर/ हेमा हिरासकर : उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ वर्षांच्या यशस्वी कार्याचा परिवार उत्सव गुरुवारी (दि. १७) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohan Bhagwat) प्रमुख उपस्थित राहणार आहेत. उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
उद्योगवर्धिनीची सुरुवात स्व. नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून झाली. २४ वर्षांपूर्वी नानाजी देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे नामकरण झाले आणि त्यानंतर तीन वर्षांनी संस्थेची औपचारिक स्थापना झाली. महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेने दोन दशकांहून अधिक काळात शेकडो महिलांना व्यवसाय आणि रोजगाराचे प्रशिक्षण देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे. (Dr. Mohan Bhagwat)
“गेल्या २१ वर्षांत १० हजारहून अधिक महिलांना व्यवसाय व रोजगार विषयक मार्गदर्शन देण्यात आले असून, त्यातून ३५० उद्योजिका घडल्या आहेत,” असे यावेळी चंद्रिका चौहान यांनी सांगितले. (Dr. Mohan Bhagwat)
उद्योगवर्धिनीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि संस्थेने घडवलेल्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी लिखित आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर संपादित ‘उद्योगवर्धिनी की सेवाव्रती’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित माहितीपट ‘अखंड यात्रा’ चे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रम निमंत्रित मान्यवरांसाठीच असून प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी दिली.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांच्यासह सचिवा मेधा राजोपाध्ये, मार्गदर्शक समितीचे सदस्य राम रेड्डी, डॉ. सुहासिनी शहा, वासुदेव बंग, डॉ. माधवी रायते, केतन वोरा, आनंद जोशी, धिरेन गडा, उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, खजिनदार वर्षा विभुते, संचालिका ॲड. गीतांजली चौहान, शांताबाई टाके, सुलोचना भाकरे, दिपाली देशपांडे तसेच सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.