
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Pandharpur Wari) पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांमधील पारंपरिक उभे व गोल रिंगण सोहळा शुक्रवारी बाजीराव विहीर परिसरात अत्यंत भक्तिभावात पार पडला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळमृदंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसला.(Pandharpur Wari)
दुपारी १ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा(Pandharpur Wari) पालखी सोहळा भंडीशेगाव येथून प्रस्थान करत वाखरीच्या दिशेने रवाना झाला. याच दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथून मार्गस्थ झाला. यानंतर दोन्ही पालख्या बाजीराव विहीर येथे रिंगणासाठी दाखल झाल्या.(Pandharpur Wari)
दुपारी ४ वाजता संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण पार पडले. या रिंगणासाठी महामार्गावरील उड्डाणपुलावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मैदानावर फुगड्या, भारुड, सुरपाटे यांसारख्या पारंपरिक खेळ व कार्यक्रमांनी वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.(Pandharpur Wari)
सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रिंगण स्थळी पोहोचला. त्यानंतर सेवेकर्यांनी टाळमृदंगाच्या गजरात पालखी गोल रिंगणात नाचवत संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. मानाच्या दिंड्यांनी रिंगणात प्रदक्षिणा घातल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. पारंपरिक तीन फेर्यांनंतर रिंगण पूर्ण झाले. अश्वाच्या टापांची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.
या वर्षीचे हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण ठरले. रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी वाखरी येथील पालखी तळावर विसावला. शनिवारी दुपारी पालखी सोहळा वाखरीतून प्रस्थान करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. संतांच्या पालख्या वेशीवर दाखल होताच पांडुरंगाच्या जयघोषात आकाश दुमदुमले आहे. भाविकांची गर्दी, नयनरम्य सोहळा आणि भक्तीमय वातावरण यामुळे या रिंगण सोहळ्याचा अनुभव प्रत्येक वारकऱ्यासाठी अविस्मरणीय ठरला.