
Rajesh Kumar
मुंबई : शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar) यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.(Rajesh Kumar)
राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar) यांनी यावेळी सांगितले.
मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar) यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे :मुख्य सचिव राजेश कुमार (भा.प्र.से. 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे.
श्री.राजेशकुमार (Rajesh Kumar) यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.