पुणे/विशेष प्रतिनिधी : राज्यात सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात मुंबई विभागातील २ लाख ६५ हजार ९०० अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान्या प्रक्रियेत सोमवारी दुपारपर्यंत ९२ तक्रारींची नोंद झाली असून, त्यातील ८५ टक्के तक्रारींचे निराकरण झाले आहे. उर्वरित १५ टक्के तक्रारींमध्ये ओटीपी न मिळणे, रिपीटर विद्यार्थ्यांना फ्रेशर आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना रिपीटर म्हणून नोंद करणे, नाव व शैक्षणिक वर्ष वेगळे, मात्र सीट नंबर एकच असणे, आदी तक्रारींचा समावेश आहे. तक्रारी लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी जाहीर केला.
प्रवेश प्रक्रियेमध्ये फ्रेशर विद्यार्थिनीची रिपीटर म्हणून नोंद झाली. अशा विद्यार्थ्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता त्यांना मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.
दोन विद्यार्थ्यांचे एकच सीट क्रमांक, पण वर्ष वेगळे असले तरी नोंदणीमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे पालक वृषाली झगडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत केंद्राकडून तक्रार सोडविण्याचा प्रयत्न होतो आहे.
विभागवार नोंदणी
- पुणे १,८७,९२५
- मुंबई २,६५,९००
- कोल्हापूर १,०७,०१२
- छ. संभाजी नगर १,००,०४०
- नाशिक १,१२,१०८
- नागपूर ९५,२१०
- लातूर ५८,५८६
- इतर ६१,७१२
ज्या सॉफ्टवेअर कंपनीला ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने प्रवेशप्रक्रियेत अडथळा आल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले.
