सांगोला / प्रतिनिधी: पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांची जीप सांगोला तालुक्यात अपघातग्रस्त झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप ब्रिजच्या कठड्याला धडकली आणि या भीषण अपघातात १२ भाविक जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे ११ वाजता रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचेगाव ता. सांगोला हद्दीत घडला. खैरवाड ता. खानापूर, जि. बेळगाव येथून जीपमधून १२ भाविक पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत होते.
या जीपमध्ये विठ्ठल नारायण कोळेकर, माणिक गुंडू कोळेकर, अजूबा लक्ष्मण सागरेकर, रैमानी भैरू बस्तवाडकर, यल्लारी रुक्मण्णा गुरव, तानाजी झुंजवाडकर, परसराम नाळकर, जोतिबा वाकळे, रुद्रप्पा भुजगुरव, शंकर मंडलकर, परसराम पाटील आणि कृष्णा भुजगुरव हे प्रवासी होते.
चालक अमोल चंद्रकांत पाटील (रा. आलेहोळ) याचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या ब्रिजच्या कठड्याला धडकले. या धडकेत प्रवाशांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापती झाल्या.
चार गंभीर जखमींना तातडीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून उर्वरित आठ जणांवर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी प्रवासी कृष्णा बुधप्पा भुजगुरव यांच्या फिर्यादीनुसार चालक अमोल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
