
ढाका : बांग्लादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत फारिया (Nusraat Faria) ज्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारून प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती, सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत. नुसरत फारियाला 18 मे 2025 रोजी ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली असून, तिच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप आहे.
थायलंडला जात असताना अटक
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत थायलंडला जाण्यासाठी ढाका विमानतळावर पोहोचली होती, त्याचवेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्याविरोधात पूर्वीच अटक वॉरंट जारी झालं होतं. या प्रकरणात नुसरतसह १७ अन्य कलाकारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर, तिला लगेच तपास यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आलं.
कोणता आहे आरोप?
अभिनेत्रीवर लावलेला “खूनाच्या प्रयत्नाचा” आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी, या प्रकरणाचा संबंध राजकीय उलथापालथीशी जोडला जात आहे. विशेषतः, नुसरतच्या अटकेनंतरच शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला, ही बाब अनेक शंका निर्माण करते.
पोलिसांची प्रतिक्रिया
ढाका पोलिस अधिकारी सुजान हक यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना अटकेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, नुसरत फारिया यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, सर्व पुरावे तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. ही कारवाई पूर्णपणे वॉरंटनुसार व कायदेशीर प्रक्रियेने केली गेली आहे.
एक अभिनेत्री की राजकीय बळी?
नुसरत फारिया या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर शेख हसीना यांच्या भूमिकेमुळे त्या एकप्रकारे राजकीय चेहरा बनल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांच्या अटकेनं कलाक्षेत्र, राजकारण आणि न्यायव्यवस्था या तिघांतही प्रचंड खळबळ माजवली आहे.