
सांगोला : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या जलसंवर्धन पंधरवड्या निमित्त येथील माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था सांगोला या सामाजिक संस्थेने जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त एक अभिनव नवीन उपक्रम राबवून जनसंवर्धनाचा प्रयत्न केलेला आहे. जलसंवर्धन पंधरवड्यात सुरू केलेला हा प्रकल्प दि. १३ मे रोजी पूर्ण झाला असून तो प्रकल्प अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्ग अर्पण करण्यात आल्याची माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना घोंगडे यांनी सांगितले की, आमच्या संस्था सदस्यांनी विचार करून अनेक जलसंवर्धन अभ्यासकाशी संपर्क साधून माण नदीला मिळणाऱ्या ओढ्यावर पाणीसाठा होणाऱ्या ठिकाणी शंभर / शंभर फुटी पाच बोअरवेल घ्याव्यात व पावसाचे पडणारे पाणी १०० फूट खोलवर जमिनीच्या पोटात कसे मुरेल याबाबत विचार करून आम्ही मेडशिंगी ता. सांगोला येथील अफ्रुका ओढ्यावर बांधलेल्या सिमेंट नाल्याच्या पाणी साठ्याच्या ठिकाणी आतील बाजूस नाल्याच्या भिंतीपासून ७० मी. पाठीमागे मधोमध एक व त्यापासून समान अंतरावर दोन्ही बाजूला दोन असे एका रेषेत १०० फूट खोलीचे तीन बोअर घेतले. त्याच्या पुढे दोन-दोन च्या मध्यभागी साठ फुटावर दुसरे दोन एकूण पाच बोअरवेल घेतले. प्रत्येक बोरवेलच्या वरील बाजूस २० / २० फुटी क्रेसिंग पाईप टाकल्या.
या प्रत्येक बोअरवेलच्या भोवताली पाच फूट लांब, पाच फूट रुंद व पाच फूट खोल असे प्रत्येक बोअरवेलला खड्डे काढले. नंतर क्रेसिंग पाईप वर बारा एमएमची छिद्रे पाडली आहेत. छिद्रे पाडलेल्या पाईप वरती वायरच्या कापडाचे अच्छादन लावून ते प्लास्टिकच्या सुतळीने बांधले. त्यानंतर पाईप वर झाकण्यासाठी आणलेल्या झाकणावर बारा एमएम चे दोन-दोन छिद्रे घेऊन त्या झाकणाला जाळी लावून बोरवेलवर मजबूत झाकली. प्रत्येक खड्ड्यात पहिल्या थराला योग्य उंचीचा जाड दगडाचा थर दिला, त्यावर नदीतील गोल गोट्यांचा थर दिला व त्यावर मध्यम प्रतीच्या खडीचा थर देऊन पाचही खड्डे बोरिंगवेल वरील पाईप बरोबर भरले. आणि हे सर्व बोअरवेल निसर्गाच्या स्वाधीन करण्यात आले. या परिसरात सिमेंटनाल्या पासून खाली सहा विहिरी व बोअर आहेत.
उन्हाळ्यात म्हणजेच जानेवारीनंतर या विहिरीवर अतिशय कमी पाणी असते. पुढील वर्षाच्या जानेवारी ते मे पर्यंत विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत वाढ दिसून आली तर या नवीन जलसंवर्धन प्रकल्पाचा उपयोग झाला असे म्हणता येईल व लोकसहभागातून असे प्रकल्प वाढवता येतील. असे मत अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी व्यक्त केले. प्रत्येक बोअरवेल भरल्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक बोरवेलचे पूजन करून निसर्ग अर्पण करण्यात आले. त्यामध्ये या संपूर्ण प्रकल्पाची शास्त्रोक्त रचना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाचे सदस्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक केली. या प्रतिष्ठानने आत्तापर्यंत शेकडो सिंगल बोअरवेलचे प्रकल्प उभे केले आहेत.
परंतु एकाच ठिकाणी पाच बोअरवेलचा प्रकल्प हा पहिलाच असून याचे फलित काय होते हे आमच्या प्रतिष्ठानच्या सदस्याना पाहण्याची उत्कंठा असल्याचे प्रतिष्ठानचे मार्गदर्शकानी मत व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी राजाभाऊ वाघमारे, सरपंच प्रतापसिंह इंगवले, डॉ. मच्छिंद्र सोनलकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या कामी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच प्रभाकर कांबळे, प्रभाकर कसबे, गुंडोपंत साळुंखे, संजय मोरे इ. नी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सांगलीकर काका, राजेंद्र यादव, समाजसेवक बसवेश्वर झाडबुके, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाचे सदस्य, वाढेगांव ग्रा. पं. चे उपसरपंच शिवाजी दिघे, सदस्य राहुल घोंगडे, तानाजी आळतेकर इ. सह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.