पुणे / प्रतिनिधी : पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असा संदेश असलेली पोस्ट शेअर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दखल घेतली असून, तरुणीचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सामाजिक माध्यमांवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सकल हिंदू समाजाने ट्विटर या प्लॅटफॉर्मवर ही बाब उघडकीस आणली आणि संबंधित तरुणीवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार , संबंधित तरुणी पुण्यातील शिक्षणसंस्थेत शिकत आहे आणि तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ही वादग्रस्त पोस्ट शेअर केली गेली होती. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तरुणीने तिचे इंस्टाग्राम खाते डिलीट केल्याचेही निदर्शनास आले.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितले की, “या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास सुरू करण्यात आला आहे.” दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
