
पुणे / प्रतिनिधी : कोलवडी गावातील मुळा-मुठा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 35 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये पोकलँड मशीन, 2 ट्रॉलीसह ट्रॅक्टर आणि 8 ब्रास वाळूचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय 38, रा. भैरोबा वस्ती, कोलवडी, ता. हवेली असे असून, त्याच्यावर खून, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, दंगल घडवणे यांसारखे गंभीर गुन्हे कोंढवा, पौड व हडपसर पोलीस ठाण्यांत नोंदवले आहेत. तो दोन वर्षांसाठी तडीपारही होता.
युनिट 6 च्या पथकाने थेऊर–कोलवडी मार्गावर गस्त घालताना कोलवडी येथील शितोळे वस्ती परिसरात ही कारवाई केली. तेथे अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली. आरोपीला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांच्या चमूने महत्त्वाची भूमिका बजावली.