
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरातील एका नामवंत हॉटेलमध्ये बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये चहा-नाश्त्याच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवला जात असून, या प्रकरणात बाहेरील महिलांचा सहभाग असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हॉटेलच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
सांगोला एसटी स्टँडच्या मागील परिसरात एक हॉटेल असून, त्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. तक्रारीनुसार, या ठिकाणी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय, हॉटेलमध्ये येणाऱ्या काही व्यक्तींकडून महिलांना आणि मुलींना त्रास होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
तरुणाईचं बिघडलेलं वर्तन?
स्थानिकांनी हॉटेलमधील काही ‘फॅमिली रूम्स’मध्ये गैरप्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच, कॉलेजमधील काही तरुण-तरुणी या परिसरात एकत्र जमून अनुचित वर्तन करत असल्याची माहितीही काही नागरिकांनी दिली आहे. यामुळे समाजात चीड निर्माण होत असून, संबंधित घटकांवर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
साफसफाई आणि अन्न गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह
तक्रारीनुसार, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे पाणी दूषित असून, टाकी नियमितपणे स्वच्छ केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम चव वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर केला जात असल्याची शंका असून, हे आरोग्यास घातक ठरू शकते.
प्रशासनाची चौकशी आणि कारवाईची मागणी
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, हॉटेलच्या परवानग्या, अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि संभाव्य अनैतिक व्यवहार यावर प्रशासकीय स्तरावर तपास व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सांगोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.