Operation Sindoor
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam in Jammu and Kashmir) पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत निर्णायक कारवाई केली. या कारवाईत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 प्रमुख दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत मिसाईल हल्ले केले आणि 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
भारताच्या या अचूक आणि संयमी कारवाईचे अमेरिका, इस्रायल, फ्रान्स, ब्रिटन (America, Israel, France, Britain) यांसारख्या आघाडीच्या देशांनी जोरदार स्वागत केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर भारताची भूमिका अधिक दृढ झाली आहे. मात्र, काही राष्ट्रांनी भारताच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे.
तुर्की, अझरबैजान आणि कतारचा विरोध
भारताच्या कारवाईनंतर तुर्की, अझरबैजान आणि कतार या तीन मुस्लिमबहुल राष्ट्रांनी पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत संयुक्त निवेदनात “भारतीय कारवाईमुळे दक्षिण आशियात तणाव वाढण्याची शक्यता” असल्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पाकिस्तानला “संपूर्ण समर्थन” दिल्याची जाहीर घोषणा केली आहे. काही राजनैतिक विश्लेषकांच्या मते, हे राष्ट्र पाकिस्तानशी असलेल्या धार्मिक व आर्थिक संबंधांमुळे भारताच्या विरोधात उभं राहिले आहेत.
भारताचा स्पष्ट संदेश : केवळ दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई
भारतानं स्पष्ट केलं आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्याही पाकिस्तानी नागरी, लष्करी किंवा आर्थिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. ही कारवाई केवळ जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवरच केंद्रित होती.
पाकिस्तानची घबराट, ‘युद्ध जाहीर’चा आरोप
पाकिस्तानने भारताच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत याला “युद्धाची घोषणा” ठरवलं आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघ व ओआयसीकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाने अद्याप भारताच्या कारवाईला समर्थन देण्याचीच भूमिका घेतली आहे.
