सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत खुनाचे तब्बल १३० गुन्हे पोलिसांत नोंद झाले असून, त्यातील बहुतांश गुन्ह्यांचे मूळ हे चारित्र्यावर संशय, अनैतिक संबंध आणि जमिनीचे वाद हे आहेत. जन्मभर साथ द्यायच्या शपथा घेणाऱ्या नात्यांत संशयाचं विष पसरत असून, क्षणिक राग, वाद किंवा जळफळाटातून नात्यांचा गळा दाटवण्याचे प्रकार वाढले आहेत.
रक्ताच्या नात्यांनाही हरताळ
अक्कलकोट तालुक्यात मुलानेच प्रेयसीच्या मदतीने आपल्या आईचा खून केला. मंगळवेढ्यात पत्नीबरोबर आढळलेल्या तरुणाचा पतीने खून केला. एका प्रकरणात प्रियकराने प्रेयसीच्या नवऱ्याचा खून केला आणि स्वतः तलावात बुडून मरण पावला. ही घटना ग्रामीण पोलिसांनी नोंद गेल्या आहेत.
जमिनीच्या वादावरूनही रक्तपात
शेतीच्या बांधावरून झालेले वाद, घराच्या हिस्स्यावरून निर्माण झालेला तणाव अशाही कारणांनी अनेकांनी खूनासारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. काही घटनांत तर पोटच्या मुलांकडूनच वृद्ध आई-वडिलांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत.
खुनाची आकडेवारी (ग्रामीण पोलीस)
| वर्ष | खून | खुनाचा प्रयत्न |
| 2023 | 63 | 96 |
| 2024 | 67 | 77 |
| एकूण | 130 | 163 |
कायद्यातील तरतुदी काय सांगतात?
जिल्हा सरकारी वकील यांनी दिलेल्या माहितीनुसार:
- खून सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 नुसार फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद आहे.
- आरोपी पॅरोलवर सुटून पुन्हा खून करत असेल, तर त्यालाही फाशीची शिक्षा होऊ शकते.
- कलम 109 अंतर्गत खुनाचा प्रयत्न सिद्ध झाल्यास 10 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.
घरगुती संघर्षातही वाढ
सोलापूरच्या कौटुंबिक न्यायालयात दरमहा सरासरी ३० घटस्फोटाचे अर्ज दाखल होत असून त्यामध्ये बहुतेक वेळा पत्नींच्या वतीने अर्ज केले जातात. कारणांमध्ये प्रॉपर्टी, चारित्र्यावर संशय, सासर-माहेरचं हस्तक्षेप आणि जबाबदाऱ्या न पेलण्याची परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. न्यायालयीन समुपदेशनानंतरही अनेकजण आपल्या चिमुकल्यांचा विचार न करता घटस्फोटासाठी आग्रह धरत असल्याचे नमूद केले जाते.
