अकोला/प्रतिनिधी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी २ मे रोजी अकोल्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाने शहरातील रस्ते घोषणांनी आणि ट्रॅक्टरच्या रांगा यांनी दणाणून गेले.
शेकडो ट्रॅक्टर, हातात मागण्यांचे फलक आणि शेतकऱ्यांचा संतप्त आवाज घेऊन निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते आणि आमदार नितीनबापू देशमुख यांनी केले. शहरातील प्रचंड उन्हातही मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते.
सरकारवर घोषणांची पूर्तता न करण्याचा आरोप
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि विविध योजनांची आश्वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्या फक्त कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप शिवसेनेने यावेळी केला. शेतकऱ्यांची फसवणूक थांबवून तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या, पीकविमा योजनांतील अपयश, तसेच वाढत्या उत्पादनखर्चाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
शिवसेनेचा इशारा : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करू.
