अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यात मंदिर संवर्धनाचा उल्लेखच नाही? – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल

कोल्हापूर / प्रतिनिधी: “अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यात केवळ बाह्य सौंदर्यीकरणावर भर दिला असून, मंदिराच्या मूळ रचनात्मक जतन-संवर्धनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” अशी तीव्र टीका सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी केली. “मंदिरातील फुटलेली शिल्पं, गळकी छप्पर, सुटलेले दगड – यांचं काय?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आराखड्यात मूळ मंदिराच्या संवर्धनाचा समावेश करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अंबाबाई व जोतिबा मंदिर विकास आराखड्याबाबत झालेल्या बैठकीत मिसाळ यांनी ही भूमिका मांडली. बैठकीस आमदार अमल महाडिक, महापालिका प्रशासक मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी विजय भोपळे, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
“प्रथम मूळ मंदिर, मग इतर विकास” – मिसाळ यांचा स्पष्ट संदेश
मिसाळ म्हणाल्या, “आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातच मंदिराच्या मूळ शिल्पकलेचे संवर्धन आणि जतन यास प्राधान्य द्या. मंदिरावर ६४ योगिनी व अन्य ऐतिहासिक शिल्पे आहेत, त्यातील काही फुटलेली आहेत. या बाबतीत केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन, तज्ज्ञांच्या मदतीने पाहणी करावी.”
जिल्ह्याच्या शासकीय जमिनी वापरण्याची सूचना
अंबाबाई मंदिर परिसराच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करताना कपिलतीर्थ मार्केट, पागा इमारत, शेतकरी संघ, विद्यापीठ हायस्कूल यासारख्या शासकीय जागांचा वापर करता येईल, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला.
जोतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपण व पर्यावरणपूरक उपाय
जोतिबा परिसरातील आराखड्यावर बोलताना मिसाळ म्हणाल्या की, “जोतिबा डोंगर प्लास्टिकमुक्त करावा, अधिकाधिक वृक्षारोपण करावे. भाविकांसाठी नारळ फोडण्याचे ठिकाण, अगरबत्ती-दीप लावण्याची जागा, तसेच स्वच्छतागृहे व फूड प्लाझाची सोय अशा सुविधा आराखड्यात समाविष्ट करा.”
आधुनिक स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध
आमदार अमल महाडिक यांनी मंदिराच्या बाह्य परिसरात आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास, जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवून देता येईल असे सुचवले.
नवीन आराखड्यात प्राचीन मंदिराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्याला न्याय मिळेल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.