
जळगाव /प्रतिनिधी: प्रेमविवाहाच्या रागातून तरुणीचा वडिलांनी थेट आपल्या मुलीवर गोळीबार करून तिचा जागीच खून केल्याची धक्कादायक घटना चोपड्यात घडली. या गोळीबारात मुलगी मृत्युमुखी पडली असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
प्रेमविवाहाचा रोष बनला मृत्यूचे कारण
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावचे रहिवासी आणि सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान यांचा मुलीने दोन वर्षांपूर्वी करवंद, ता. शिरपूर, सध्या राहणार कोथरूड, पुणे वय २८, या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता.
चोपडा शहरातील खाइवाडा जवळील आंबेडकर नगर येथे बहिणीच्या हळदी समारंभात तरुणी आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी अचानक तरुणीचे वडिल कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि थेट गोळीबार केला.
घटनास्थळी तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर
गोळ्यांच्या माऱ्यात तरुणी जागीच मृत्युमुखी पडली, तर तरुण पाठीवर व पोटावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेने समारंभात एकच गोंधळ उडाला.
संतप्त नातेवाईकांनी आरोपी वडिलांना बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोपडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू या प्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.