पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच; नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय लष्कराचे जोरदार प्रत्युत्तर

विशेष /प्रतिनिधी : पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दाखवत नाहीये. शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार करत युद्धबंदीचे उल्लंघन केले.
श्रीनगरमधील एका संरक्षण अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
शनिवारी रात्री, LOC वरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून अचानक गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तणाव
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच वातावरण तणावपूर्ण आहे. या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश होता. याशिवाय २० हून अधिक लोक जखमी झाले होते. पुलवामा (२०१९) नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
भारताचा ठाम पवित्रा
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. २४ एप्रिलला भारताने घोषणा केली की २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले सर्व व्हिसा रद्द केले जातील.
पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही तातडीने मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या हिंदू पाकिस्तानी नागरिकांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.