देश- विदेश

आभाळफाटी, भूस्खलनाने कहर! ३ मृत, १०० हून अधिकांचे प्राण वाचवले


जम्मू-काश्मीर / प्रतिनिधी :जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी रात्री अचानक झालेल्या आभाळफाटी आणि मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलनाची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक नागरिकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. कुंड आणि धरमकुंड गावात घरांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक वाहनेही या दुर्घटनेत नष्ट झाली आहेत.
रविवारी सकाळी सुरू झाले भूस्खलन, कुंड गावात सर्वाधिक तडाखा
रामबन जिल्ह्यातील कुंड गावाला सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) काही वेळेसाठी पूर्णतः बंद झाला. नाशरी ते बनिहाल दरम्यानच्या भागात भूस्खलन झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

पोलिसांनी पावसातच सुरू केलं रेस्क्यू ऑपरेशन
अंधार, धुके आणि अजूनही सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरही पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, १०० पेक्षा अधिक ग्रामीण नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. धरमकुंड गावात जवळपास ४० घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती उधमपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, “भूस्खलनामुळे महामार्ग बंद झाला आहे. दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला असून, प्रभावित कुटुंबांना तात्काळ मदत सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकारी बसीर-उल-हक यांच्या संपर्कात आहोत. गरज पडल्यास खासदार निधीतूनही मदत केली जाईल.”
प्रशासन सतर्क, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन
वाहतूक विभागाच्या प्रवक्त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “पावसाचा जोर ओसरेपर्यंत NH-44 वरून प्रवास करू नये.” प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि बचाव व पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button