सोलापूर / प्रतिनिधी : राज्यातील कुशल व अकुशल मजुरांच्या एकूण 3800 कोटी पैकी अकुशल मजुरांचे 1200 कोटीचे सोमवारपासून जिल्ह्यांना वितरण, यंत्रणांनी संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर मजुरीची रक्कम त्वरित जमा करावी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 265 योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पात्र शेतकरी व मजूर यांना लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोजगार हमी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व मजुरांना उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार हमी योजनेत नव संकल्पना राबवाव्यात, असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील रोजगार हमी योजनाच्या कामांचा आढावा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतला, याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, क्रमांक 2 चे संतोष कुलकर्णी, पंढरपूरचे अमित निमकर यांच्या सह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
रोहयो मंत्री श्री गोगावले पुढे म्हणाले की, योजना राबवत असताना कामाविषयी तक्रारी होत असतात, परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. तरी अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामाची 2600 कोटीची मजुरी तर अकुशल कामाचे बाराशे कोटी केंद्र शासनाकडे थकीत होते. त्या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झालेली असून त्यातील व अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असून तो निधी सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे. तरी हा वितरित झालेला निधी तात्काळ संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर जमा करावा व उर्वरित 2600 कोटीचा निधीही पुढील आठवड्यात राज्य शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती रोहयो मंत्री श्री. गोगावले यांनी यावेळी दिली. तसेच 60: 40 अंतर्गत स्थगिती दिलेल्या कामांनाही लवकरच सुरू करण्याबाबत मान्यता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहयो अंतर्गत वन औषधी लागवड, बांबू लागवड यासारख्या नवीन योजना राबवल्या जात असून संबंधित शासकीय विभागांनी अन्य नव संकल्पना राबवून मजूर व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू राहतील व मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश श्री गोगावले यांनी दिले.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात विविध यंत्रणा मार्फत एक हजार दोनशे एक कामे सुरू असून त्या कामावर 732 मजूर काम करत आहेत या कामांमध्ये जिल्हा परिषद व कृषी विभागाची कामे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवरील 96% मजुरांचे आधार लिंक करण्यात आलेले असून या सर्व मजुरांना त्यांची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यावर दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याप्रमाणे सद्यस्थितीत जिल्ह्यात रोजगार हमीची सेल्फ वरील कामांची संख्या 24492 इतकी असून दहा लाख 3900 मजुरांना जॉब कार्ड दिलेल्या असून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमीचे काम झाले असल्याचे त्यांनी सांगून जिल्ह्यात त संबंधित मजुरांना सात दिवसाच्या आत मजुरी देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देऊन फळ उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असून जिल्हा केळी निर्यातीत आघाडीवर असून लवकरच उत्पादनात ही जळगाव जिल्ह्याला मागे टाकेल असे सांगितले. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना कामांचा 26 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
