पुणे / प्रतिनिधी: धायरी परिसरातील एका सराफा दुकानावर नकली पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे राजेश ऊर्फ राजू चांगदेव गालफाडे (वय ४०) आणि श्याम शेषेराव शिंदे (वय ३७, दोघेही रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी आहेत.
ही लूट १५ एप्रिल रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास धायरी येथील रायकर मळा परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफा दुकानात झाली होती. तीन चोरट्यांनी दुकानात घुसून एकाने ग्राहक असल्याचा बनाव करत सोन्याची चैन दाखविण्यास सांगितले. त्यानंतर इतर दोघांनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानमालक विष्णू सखाराम दहिवाळ (वय ४२) आणि कामगार सचिन टाक यांना जीवे मारण्याची धमकी दिली व दहिवाळ यांना कानाजवळ मारहाण करत २२ तोळे वजनाचे दागिने चोरून पसार झाले.
या धाडसी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भोसरी परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
अटक आरोपींना पुढील तपासासाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदिपान पवार यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या पथकात सहाय्यक निरीक्षक सी. बी. बेरड, उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, हवालदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे, अंमलदार तनपुरे, विनायक येवले, अमोल सरतापे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे यांचा समावेश होता.
