
मुंबई/प्रतिनिधी : एसटी प्रवासादरम्यान महामार्गावरील ठराविक हॉटेलांवर बस थांबवण्याची सक्ती आता संपुष्टात येणार आहे. प्रवाशांना महागडे, निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छ प्रसाधनगृहे आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक यावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
“प्रवाशांच्या आरोग्यावर कोणतीही तडजोड चालणार नाही,” असे स्पष्ट करत सरनाईक यांनी निकृष्ट सेवा देणाऱ्या हॉटेल थांब्यांवर झाडाझडतीचे आदेश दिले आहेत.
प्रवाशांना सकस, स्वच्छ आणि किफायतशीर जेवण उपलब्ध नसल्यास अशा थांब्यांना थेट रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
१५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश
सध्या सुरू असलेल्या हॉटेल थांब्यांचे सर्वेक्षण करून, त्यावर आधारित सविस्तर अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना देण्यात आल्या आहेत.
या तपासणीत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, फक्त प्रवाशांच्या सोयीचा विचार करावा, असा कडक इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.
उत्पन्नापेक्षा प्रवाशांची सुविधा महत्त्वाची
“हॉटेल थांब्यांमधून एसटीला मिळणारे उत्पन्न बुडाले तरी चालेल, पण प्रवाशांच्या आरोग्याशी आणि सोयीसुविधांशी तडजोड होणार नाही,” असे मंत्री सरनाईक यांनी ठामपणे सांगितले.
अस्वच्छ, उद्धट वर्तन करणाऱ्या किंवा अयोग्य सुविधा देणाऱ्या थांब्यांना रद्द करून नव्या थांब्यांना मान्यता द्यावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.