सांगोला/विशेष प्रतिनिधी : मा. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, वाकी (शिवणे), शिवणे, एकतपूर, सांगोला आणि कमलापूर या सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.
या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचा पाणीपुरवठा मिळणार आहे.शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना या गावांचा सिंचन योजनेत समावेश करून पाणीपुरवठ्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे या गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली असून, भविष्यात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
