
सांगोला/महेश लांडगे : “थोर पुरुषांच्या विचारांमुळेच महाराष्ट्र घडला आहे. मात्र, मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती थंडावली असून, त्यामुळे आपल्या मूल्यव्यवस्था दुर्बल होत आहेत. अनेक बोली भाषा लोप पावत आहेत, यावर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात योग्य वापर करून तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मायमराठीवर प्रेम केल्यास भाषेच्या जपणुकीस मदत होईल,” असे मत प्रा. डॉ. किसन माने यांनी व्यक्त केले.
सांगोला महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. जमीर तांबोळी, भगवंत कोळी, कु. सेजल कवठेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. सानिया शेख आणि कु. वैष्णवी दौंडे यांनी केले. तर आभार प्रा. संतोष लोंढे यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असून, युवकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.