
तेलंगणा : तेलंगणातील श्रीशैलम घाटात झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचे भाऊ भागवत खोडके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघात कसा घडला?
सुधाकर पठारे आणि त्यांचे बंधू भागवत खोडके इनोव्हा कारने प्रवास करत होते. दुपारी सुमारे १२ वाजता नगरकुरनूलजवळील घाटात त्यांच्या वाहनाला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात सुधाकर पठारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर भागवत खोडके यांच्या पोटाला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुधाकर पठारे – एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी
सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या महाराष्ट्र पोलिस दलात उपायुक्त (डीसीपी) पदावर कार्यरत होते. मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे गावचे रहिवासी असलेल्या पठारे यांनी एम.एस्सी. अॅग्री आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते.
प्रेम की प्रतिशोध? तरुणीचा खून, तरुणाची आत्महत्या दुहेरी मृत्यूमुळे खळबळ
त्यांनी १९९५ मध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला. १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी (वर्ग १) म्हणून निवड झाली, तर १९९८ मध्ये पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर नियुक्ती मिळाली. त्यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर, राजुरा येथे उपअधीक्षक पदावर, तर चंद्रपूर आणि वसई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिली.
मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली होती. संघटित गुन्हेगारीविरुद्ध त्यांनी मोक्का, तडीपारी, एमपीडीए यांसारख्या कठोर कारवाया केल्या आणि पोलीस दलात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.