
सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
उत्साहात साजरा झाला रौप्य महोत्सव
मोरवड, तालुका करमाळा येथे सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर, सचिव रोहितदादा मोहोळकर, मुख्याध्यापक श्री. मोहोळकर, नेचर डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जुन देसाई, तसेच मोरवड गावचे सरपंच रामहरी कुदळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारचे सहकार्य – पालकमंत्री गोरे
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहोळकर कुटुंबाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान
विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची मदत – मंत्री दत्तात्रय भरणे
यावेळी क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, या संस्थेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवावे यासाठी आवश्यक असलेले सर्व क्रीडा साहित्य सरकारकडून उपलब्ध करून दिले जाईल.
शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांची गौरवशाली वाटचाल
मुख्याध्यापक श्री. मोहोळकर यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, खंडोजी मोहोळकर गुरुजींनी २००० साली संस्थेची स्थापना केली आणि गरीब व गरजू शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने कार्य सुरू केले. आज या संस्थेने मोठी प्रगती साधली असून तिचे विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत.