
सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनाची महसूल मंत्री यांनी तात्काळ दखल घेत पुणे विभागीय आयुक्तांना फोन करून चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दत्तात्रय सावंत यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना दिली.
दत्तात्रय सावंत यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले, तहसीलदार संतोष कणसे हे सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणुक देत नाहीत तर उलट अरेरावी करताना समोर आले आहे. तर वाळु माफिया, हप्ता वसुली करणारे एजंट व ५९ माफिया यांना ते जवळ करत लाखोची अफरातफर करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून तालुक्यामध्ये बेकायदेशीर कामाचे अनेक एजंट तयार झालेले आहेत. दरम्यान एजंट तालुक्यातील अर्जदारांकडे जावुन मांडवली करत असलेची चर्चा जोरदार सुरु आहे.
दरम्यान, तहसीलदार यांची सखोल चौकशी करुन मोबाईल सी.डी.आर, त्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ, त्यांच्या सोबत असणा-या एजंटचा सुळसुळाट याची तात्काळ चौकशी करुन यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदार यांना फोन करून चांगलीच कानउघडणी केली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लवकरच महसूल मंत्री हे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे आश्वासन दत्तात्रय सावंत यांना दिले आहे.