देश- विदेश

कॅनडामध्ये २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीची गोळी मारून हत्या ; बसस्टॉपवर असताना टोळीयुद्धात निष्पाप बळी


ओंटारियो / कॅनडा : कॅनडातील ओंटारियो प्रांतात एक धक्कादायक घटना घडली आहे. २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिचा बसस्टॉपवर उभ्या असताना गोळी लागून मृत्यू झाला. ती बसची वाट पाहत असताना दोन गटांमध्ये सुरु झालेल्या बेछूट गोळीबारात ती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ही घटना ओंटारियोतील हॅमिल्टन शहरात घडली. हरसिमरत ही मेहॉक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती सकाळी घरातून बाहेर पडून बसस्टॉपवर उभी असताना अचानक दोन कारमधून आलेल्या टोळ्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. या झटापटीदरम्यान हरसिमरतच्या छातीत गोळी घुसली. घटनास्थळीच ती बेशुद्ध पडली आणि तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

हॅमिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसिमरतचा या हिंसक प्रकाराशी काहीही संबंध नव्हता. ती पूर्णपणे निष्पाप होती आणि टोळीयुद्धाचा दुर्दैवी बळी ठरली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. एका काळ्या रंगाच्या कारमधून गोळीबार झाल्याचे या फुटेजमधून समोर आले आहे. संबंधित आरोपीने त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याचंही उघड झालं आहे.

या घटनेनंतर कॅनडातील भारतीय समुदायामध्ये शोककळा पसरली आहे. टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत ट्विटद्वारे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “हरसिमरत रंधावा हिच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दुःख झालं आहे. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना सर्वतोपरी मदत पुरवत आहोत.”

या हत्येने कॅनडामधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि हरसिमरतला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button