
इन पब्लिक न्यूज / महेश लांडगे : सांगोला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 15 वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जाणीव जागृती व्हावी. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व जनतेचा लोकशाहीतील सहभाग सतत वाढत रहावा या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगामार्फत 2010 पासून दरवर्षी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. यावर्षी या मतदान दिनाचे 15 वे वर्ष असून त्यानिमित्त “मतदान करण्यासारखे दुसरे काही नाही, मी खात्रीने मत देतो” या शीर्षकाखाली देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जात आहे.
सांगोला महाविद्यालयाची 15 वा राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच सर्वांनी मतदान नोंदणी करून कोणत्याही परिस्थितीत मतदानाचे कर्तव्य पार पाडावे व देशातील लोकशाहीला सुशिक्षक सशक्त बनवावे असे आवाहन केले.
राज्यशास्त्र विभागातील डॉ. जमीर तांबोळी यांनी मतदाराच्या प्रतिज्ञेचे विश्लेषण केले तर मराठी विभागातील प्रा. संतोष लोंढे यांनी मतदारासाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड, डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. किसन माने, महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे यांचे सहकार्य लाभले.