सोलापूर/प्रतिनिधी: सोलापूर शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल १०,००० वाहनचालकांना समन्स, तर १३०० वाहनचालकांवर वॉरंट बजावण्यात आले आहे. येत्या १० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीत हे चालक हजर राहिले नाहीत, तर अटक टळणार नाही, असा स्पष्ट इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठी कारवाई
सोलापूर शहरातील ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आणि वाहतूक पोलिसांच्या पेट्रोलिंगद्वारे नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होते. सर्वसामान्य उल्लंघनांत ट्रीपल सीट, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, वेगमर्यादा ओलांडणे आणि रस्त्याच्या उलट दिशेने वाहने चालवणे यांचा समावेश आहे.
दंड न भरल्यास समन्स, तरीही गैरहजेरी : वॉरंट
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या ई-चलानचा ९० दिवसांत भरणा आवश्यक आहे. अन्यथा राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजर राहून दंड भरावा लागतो. अनेकजण या दोन्ही टप्प्यांत अपयशी ठरल्याने आता न्यायालयीन वॉरंट बजावले गेले आहे.
” वॉरंट बजावूनही गैरहजर राहणाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाने अटक करण्यात येईल. नागरिकांनी वेळेवर दंड भरून कायदेशीर जबाबदारी पार पाडावी.”
— सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर
दंड भरण्याचे पर्याय – अटक टाळण्याची संधी
वाहनचालकांनी खालीलपैकी कोणत्याही मार्गाने त्वरित दंड भरावा:
- ई-चलान मेसेजमधील लिंकवरून ऑनलाइन
- वाहतूक पोलिस कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन
- महापालिका किंवा वाहतूक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून
दंड न भरल्यास वाहन जप्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
